मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आंबेत-टोल रस्त्यावरील मोरया (मिनी ब्रिज): उंचीचा घोळ आणि जीवघेणे खड्डे, प्रवाशांचा जीव धोक्यात!

आंबेत-टोल रस्त्यावरील मोरया (मिनी ब्रिज): उंचीचा घोळ आणि जीवघेणे खड्डे, प्रवाशांचा जीव धोक्यात!


महाड विशेष प्रतिनिधी : महाड उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या कार्यक्षेत्रातील आंबेत ते टोल रस्त्यादरम्यान नव्याने उभारण्यात आलेला मोरया (मिनी ब्रिज) आता वाहनचालकांसाठी आणि प्रवाशांसाठी मोठा धोका बनला आहे. या पुलाच्या बांधकामात केवळ दर्जाहीनता दिसून येत नसून, पुलाची उंची रस्त्याच्या पातळीपेक्षा अधिक असल्याने आणि त्याच्या लगतच मोठमोठे खड्डे पडल्याने अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. प्रशासनाच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

नव्याने बांधण्यात आलेल्या या मोरया (मिनी ब्रिज)ची उंची रस्त्याच्या तुलनेत जास्त असल्याचा गंभीर आरोप नागरिक करत आहेत. यामुळे वाहनचालकांना, विशेषतः दुचाकी आणि लहान वाहनांना, पुलावर चढताना आणि उतरताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. वेगात असलेल्या वाहनांना अचानक पुलाची उंची जास्त असल्याने ताबा गमावण्याची भीती असून, यामुळे गंभीर अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. नवीन पर्यटकांना किंवा अनोळखी चालकांना रस्त्याची आणि पुलाची कल्पना नसल्याने ही परिस्थिती अधिकच धोकादायक बनली आहे.


एकीकडे पुलाच्या उंचीचा दोष असताना, दुसरीकडे याच मोरया (मिनी ब्रिज)च्या लगत रस्त्यावर मोठमोठे, धोकादायक खड्डे पडले आहेत. नवीन बांधकाम असूनही अल्पावधीतच रस्त्याची अशी दुर्दशा झाल्याने कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हे खड्डे चुकवताना वाहनचालकांना कसरत करावी लागत असून, अचानक समोर आलेल्या खड्ड्यांमुळे वाहनांचे नियंत्रण सुटून अपघात घडत आहेत. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांचा अंदाज येत नाही, ज्यामुळे धोका आणखी वाढला आहे.

महाड सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप-अभियंता यांच्या कार्यक्षेत्रात हा रस्ता येत असतानाही, या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. "संबंधित अधिकाऱ्यांना ही बाब दिसत नाही का? की जाणीवपूर्वक जनतेला त्रास देण्याचे मनमानी काम संबंधित उपअभियंता करत आहेत का?" असे संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. अशा बोगस काम करणाऱ्या ठेकेदारांवर आणि त्यांच्या कामावर पांघरून घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

"या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे आणि सदोष पुलामुळे एखादी गंभीर घटना घडल्यास हे प्रशासन जागे होईल का?" असा उद्विग्न प्रश्न नागरिक विचारत आहेत. प्रशासनाच्या या असंवेदनशीलतेमुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास त्याला कोण जबाबदार असेल, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

जबाबदार प्रशासनाने या गंभीर बाबीची तात्काळ दखल घेऊन, युद्ध पातळीवर मोरया (मिनी ब्रिज)ची उंची दुरुस्त करून रस्त्याची डागडुजी करावी आणि निकृष्ट दर्जाचे काम करणारे ठेकेदार व अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या समस्येचे निराकरण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

0 Response to "आंबेत-टोल रस्त्यावरील मोरया (मिनी ब्रिज): उंचीचा घोळ आणि जीवघेणे खड्डे, प्रवाशांचा जीव धोक्यात!"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...