
मुख्य रस्त्यावर डम्पिंग ग्राउंड: गोरेगाव ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे निवेदन सादर..
माणगाव विशेष प्रतिनिधी: माणगाव तालुक्यातील गोरेगाव ग्रामपंचायत हद्दीतील मुख्य रस्त्यालगत अनधिकृतपणे डम्पिंग ग्राउंड तयार करण्यात आल्याने गोरेगाव परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उघड्यावर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला असून, ग्रामस्थांमध्ये याविरोधात तीव्र असंतोष पसरला आहे.
या गंभीर समस्येमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे, विशेषतः आरोग्यविषयक चिंता वाढल्या आहेत. साथीचे रोग पसरण्याचा धोका निर्माण झाला असून, लहान मुले आणि वृद्धांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या श्रीवर्धन विधानसभा सरचिटणीस श्री. झुल्फीकार टोल यांनी गोरेगाव ग्रामपंचायतीला यावर तात्काळ उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, "ग्रामपंचायतीने या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करणे हे नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्यासारखे आहे. तत्काळ हे डम्पिंग ग्राउंड हटवून कचरा व्यवस्थापनाची योग्य सोय करावी."
श्री. टोल यांनी पुढे सांगितले की, जर गोरेगाव ग्रामपंचायतीने यावर त्वरित कार्यवाही केली नाही, तर जनतेच्या हक्कांसाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. जनतेच्या आरोग्याशी आणि स्वच्छतेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. या आंदोलनात स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवतील अशी अपेक्षा आहे.
गोरेगाव शहर हा लोणेरे ते हरिहरेश्वर या राजमार्गावर (राज्य मार्ग SH99 व SH100) वसलेले आहे. गेली अनेक वर्षे या राज्यमार्गाच्या दोन्ही कडेला कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. हरिहरेश्वर आणि श्रीवर्धनला जाणारे पर्यटक याच रस्त्याचा वापर करत असल्याने, अशा उघड्या डम्पिंग ग्राउंडमुळे गोरेगाव शहराची बदनामी देखील होत आहे.
या गंभीर समस्येबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या श्रीवर्धन विधानसभा सरचिटणीस श्री. झुल्फीकार टोल यांच्याकडून गट विकास अधिकारी, माणगाव यांना दिनांक २ जुलै २०२५ रोजी निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनाची एक प्रत संबंधित तहसील कार्यालय माणगाव, तालुका आरोग्य अधिकारी आणि पर्यावरण खात्यासह इतर संबंधित सर्व खात्यांनाही पाठवण्यात आली आहे.
गोरेगाव ग्रामपंचायत या गंभीर समस्येवर काय पावले उचलते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 Response to "मुख्य रस्त्यावर डम्पिंग ग्राउंड: गोरेगाव ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे निवेदन सादर.."
टिप्पणी पोस्ट करा