
मुख्य रस्त्यावर डम्पिंग ग्राउंड: गोरेगाव ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा आंदोलनाचा इशारा....
माणगाव विशेष प्रतिनिधी : माणगाव तालुक्यातील गोरेगाव ग्रामपंचायत हद्दीतील मुख्य रस्त्यालगत अनधिकृतपणे डम्पिंग ग्राउंड तयार करण्यात आल्याने गोरेगाव परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उघड्यावर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला असून, ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
या गंभीर समस्येमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे, विशेषतः आरोग्यविषयक चिंता वाढल्या आहेत. साथीचे रोग पसरण्याचा धोका निर्माण झाला असून, लहान मुले आणि वृद्धांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या श्रीवर्धन विधानसभा सरचिटणीस श्री. झुल्फीकार टोल यांनी गोरेगाव ग्रामपंचायतीला तात्काळ यावर उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, "ग्रामपंचायतीने या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करणे हे नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्यासारखे आहे. तत्काळ हे डम्पिंग ग्राउंड हटवून कचरा व्यवस्थापनाची योग्य सोय करावी."
जर गोरेगाव ग्रामपंचायतीने यावर त्वरित कार्यवाही केली नाही, तर श्री. झुल्फीकार टोल यांनी जनतेच्या हक्कांसाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. जनतेच्या आरोग्याशी आणि स्वच्छतेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. या आंदोलनात स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवतील अशी अपेक्षा आहे.
गोरेगाव ग्रामपंचायत यावर काय पावले उचलते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 Response to "मुख्य रस्त्यावर डम्पिंग ग्राउंड: गोरेगाव ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा आंदोलनाचा इशारा...."
टिप्पणी पोस्ट करा