म्हसळा नगरपंचायतीची लेखी हमी; राष्ट्रवादी काँग्रेसचे उपोषण तात्पुरते स्थगित...
म्हसळा: शहरात वाढलेल्या मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाने पुकारलेले बेमुदत उपोषण आज स्थगित करण्यात आले आहे. म्हसळा नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी यांनी भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण मिळवण्याची लेखी हमी दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
आज, २८ ऑगस्ट २०२५ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हसळा शहराध्यक्ष माजिद सुभेदार आणि उपाध्यक्ष सलमान मेमन यांनी नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्याची घोषणा केली होती. शहरातील लहान मुले आणि महिलांवर मोकाट कुत्र्यांनी हल्ले केल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यावर तातडीने कारवाईची मागणी पक्षाने केली होती, मात्र नगरपंचायतीकडून प्रतिसाद मिळत नसल्याने उपोषणाचा पवित्रा घेण्यात आला.
मात्र, उपोषणापूर्वीच नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांनी कारवाई करण्याची लेखी हमी दिली. यामध्ये त्यांनी काही दिवसांतच भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण मिळवण्याचे आश्वासन दिले आहे.
या प्रकरणात म्हसळा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांनी मध्यस्थीची भूमिका घेत. कहाळे यांनी दी. २७ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाचे म्हसळा शहराध्यक्ष आणि उपाध्यक्षांशी सविस्तर चर्चा करून समस्येचे निराकरण करण्यासाठी मदत केली. या सहकार्याबद्दल पक्षाने पोलिसांचे आभार मानले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसने नगरपंचायतीला आता पंधरा दिवसांची मुदत दिली आहे. "या पंधरा दिवसांत भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण मिळवण्यात अपयश आल्यास, पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल," असा इशारा शहराध्यक्ष माजिद सुभेदार आणि उपाध्यक्ष सलमान मेमन यांनी दिला आहे. नागरिकांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
0 Response to "म्हसळा नगरपंचायतीची लेखी हमी; राष्ट्रवादी काँग्रेसचे उपोषण तात्पुरते स्थगित..."
टिप्पणी पोस्ट करा