म्हसळा शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा उपद्रव; राष्ट्रवादी काँग्रेसकडून उद्यापासून बेमुदत उपोषण...
म्हसळा: म्हसळा शहरात वाढलेल्या मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाने मुख्याधिकारी, म्हसळा नगरपंचायत यांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनात शहराध्यक्ष माजिद सुभेदार आणि उपाध्यक्ष सलमान मेमन यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. या कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे स्थानिक नागरिक, विशेषतः लहान मुले आणि महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अलीकडेच, ९ ते १० लहान मुले आणि महिलांवर या कुत्र्यांनी प्राणघातक हल्ला केल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या गंभीर परिस्थितीवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी पक्षाने केली होती. मात्र, म्हसळा नगरपंचायत कार्यालयाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.
या निषेधार्थ, २८ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाकडून म्हसळा नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचे समजते. पक्षाने नगरपंचायतीच्या मनमानी कारभाराविरुद्ध हे उपोषण पुकारले आहे.
या आंदोलनाच्या संदर्भात नगरपंचायतीला पत्रही देण्यात आले आहे. "नागरिकांची सुरक्षा हेच आमचे कर्तव्य आहे. प्राण गेले तरी चालतील, मात्र म्हसळावासियांच्या जीवाशी खेळ होऊ देणार नाही," असे जाहीर आव्हान पक्षाचे शहर अध्यक्ष माजिद सुभेदार आणि उपाध्यक्ष सलमान मेमन यांनी नगरपंचायतीला दिले आहे.
0 Response to "म्हसळा शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा उपद्रव; राष्ट्रवादी काँग्रेसकडून उद्यापासून बेमुदत उपोषण... "
टिप्पणी पोस्ट करा