मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

'आदित्य ठाकरेंविरोधात मला उमेदवारी द्या, मला वरळीच्या प्रश्नांची जाण', एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील मराठी अभिनेत्याचा दावा!

'आदित्य ठाकरेंविरोधात मला उमेदवारी द्या, मला वरळीच्या प्रश्नांची जाण', एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील मराठी अभिनेत्याचा दावा!


महाराष्ट्र : 
अभिनेता 
सुशांत शेलार हा मागील अनेक महिन्यांपासून एकनाथ शिंदे  यांच्या शिवसनेमध्ये सक्रिय आहे. त्यातच आता सुशांतने विधानसभा निवडणुकांसाठी रिंगणात उतरण्याची तयारी दर्शवली आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्याविरोधात सुशांत निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या तयारीमध्ये आहे. सुशांतने वरळी विधानसभा मतदारसंघावर दावा एबीपी माझासोबत बोलताना केला आहे. 

सुशांत शेलार हा अनेक महिन्यांपासून वरळी विधानसभा मतदारसंघात बराच सक्रिय असल्याचं चित्र आहे. राम मंदिरानंतर जल्लोष,गणपती,नवरात्र अशा अनेक सणांमध्ये सुशांतने बरेच कार्यक्रम वरळीत राबवले. त्यामुळे जर सुशांतला शिंदे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का याकडे लक्ष लागून राहिलं आहे. त्याचप्रमाणे वरळी मनसेकडून संदीप देशपांडेही रिंगणात आहेत. 

वरळीतल्या प्रश्नांची मला जाण - सुशांत शेलार

सुशांतने एबीपी माझासोबत बोलताना म्हटलं की, मी वरळीचा एक सामान्य नागरिक आहे. कमला मिलमध्ये काम करणाऱ्या एका सामान्य कामगाराचा मी नातू आहे, टेलिकॉम कंपनीमध्ये काम करणाऱ्या सामान्य कामगाराचा मी मुलगा आहे. चाळीतल्या घरात लहानाचा मोठा होत मी माझ्या अभिनयाचा प्रवास सुरु केला.तसाच बालशिवसैनिक म्हणूनही माझा प्रवास सुरु झाला. त्यामुळे जनसामान्यांच्या मूलभूत प्रश्नांची मला जाण आहे. इथल्या आमदारांनी पाच वर्षात ते सोडवले नाहीत म्हणून निवडणूक लढवायची आहे.

आदित्य ठाकरेंच्या विरोधात पक्ष संधी देणार?

आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभेचं नेतृत्व करत आहेत. पण शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर इतरांप्रमाणेच सुशांतनेही शिंदे गटाची साथ दिली. त्यामुळे आता वरळी विधानसभा मतदारसंघावरही तो दावा करत आहे. शिंदे गटाकडून विधानसभा निवडणुकांसाठी पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये वरळी विधानसभेसाठी अद्याप तरी उमेदवार देण्यात आलेला नाही. त्यामुळे वरळीतून शिंदे गटही सुशांतला संधी देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

मनसेकडून संदीप देशपांडेही रिंगणात 

दरम्यान वरळी मतदारसंघातून राज ठाकरेंच्या पक्षाने संदीप देशपांडेंना रिंगणात उतरवण्यात आलं आहे. त्यामुळे जर सुशांतही उमेदवारी दिली तर आदित्य ठाकरे, संदीप देशपांडे आणि सुशांत शेलार ही तिहेरी लढत वरळी विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळेल. पण वरळीकर त्यांचा कौल कुणाच्या बाजूने देणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. 

 

0 Response to "'आदित्य ठाकरेंविरोधात मला उमेदवारी द्या, मला वरळीच्या प्रश्नांची जाण', एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील मराठी अभिनेत्याचा दावा!"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...