मुंबईतील जुने जैन मंदिर पाडल्यानंतर समाज संतप्त, कारवाईविरोधात आज अहिंसक रॅली...
महाराष्ट्र,मुंबई : मंदिर पाडण्याबाबत बीएमसीने जैन समाजाला नोटीस दिली होती. त्याविरोधात जैन समाजाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर गुरुवारी सुनावणी होणार होती. त्यापूर्वीच बुधवारी बीएमसीच्या पथकाने मंदिर तोडले.
मुंबईतील विलेपार्लेतील कांबळीवाडी येथील ९० वर्षे जुने
पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर मुंबई मनपाने दोन दिवसांपूर्वी पाडले होते. त्यानंतर
देशभरातील जैन समुदाय संतप्त झाला आहे. मंदिर पाडण्याच्या कारवाईविरोधात शनिवारी
सकाळी ९:३० वाजता अहिंसक रॅली काढण्यात येईल. त्या रॅलीत मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार पराग अलवाणी यांच्यासह जैन समाजाचे संत सहभागी होणार
आहेत.
दरम्यान, मंदिर तोडलेल्या ठिकाणी जैन बांधवांकडून
आरती करण्यात येत आहे. या मंदिरावर पालिकेकडून कारवाई करण्यात आल्यानंतर आज
सर्वपक्षीय नेत्यांकडून कारवाईच्या विरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच या
पुढे काय भूमिका घ्यावी, त्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.
बीएमसीच्या कारवाईनंतर जैन समाजात
प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची
मागणी केली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार कार्यरत
आहे. बीएमसीचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासनाची जबाबदारी आता सरकारकडे आहे.
मंदिर पाडण्याबाबत बीएमसीने जैन समाजाला नोटीस दिली होती. त्याविरोधात जैन समाजाने
उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर गुरुवारी सुनावणी होणार होती. त्यापूर्वीच
बुधवारी बीएमसीच्या पथकाने मंदिर तोडले. न्यायालयाच्या निर्णयानंतर बीएमसी
प्रशासनाने कारवाई करायला हवी होती, असे जैन समाजाने म्हटले आहे.
विले पार्लेमधील नेमिनाथ कोऑपरेटीव्ह हाउसिंग सोसायटी परिसरात 90 वर्ष जुने जैन मंदिर होते. मंदिराचे विश्वस्त अनिल शाह यांनी
सांगितले की, बीएमसीने न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहिली नाही. आम्ही उच्च न्यायालयात
अपील दाखल केल्याचे बीएमसीला माहीत होते. परंतु बीएमसी प्रशासनाने घाई गर्दीत
मंदिर पाडले. आम्ही अधिकाऱ्यांना न्यायालयाच्या निर्णयापर्यंत वाट पाहण्याची
विनंती केली होती. परंतु त्यांनी आमचे काही ऐकले नाही अन् मंदिर तोडून टाकले.
या मंदिराच्या समर्थनार्थ आज जैन
बांधवांकडून आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पूर्वी या कारवाई केलेल्या
मंदिरात जैन बांधवांकडून आरती करण्यात आली. तसेच हे मंदिर कोणाच्या आदेशावरुन
तोडण्यात आले? याबाबत प्रश्न जैन बांधवांनी विचारला आहे.
0 Response to "मुंबईतील जुने जैन मंदिर पाडल्यानंतर समाज संतप्त, कारवाईविरोधात आज अहिंसक रॅली... "
टिप्पणी पोस्ट करा