Senate Election : हा दस का दम… आदित्य ठाकरे यांनी विजयी होताच भरला हुंकार...
मुंबई : Aditya Thackeray on Mumbai University Senate Election : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये ठाकरे गटाच्या युवासेनेच्या उमेदवारांनी 10 पैकी 10 जागा जिंकल्या. त्यानंतर मातोश्री येथे युवा सेनेच्या विजयाचा जल्लोष झाला. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी सर्वांच अभिनंदन करत निवडणूक निकालावर भाष्य केलं.
मातोश्री येथे उधळला विजयाचा गुलाल
याच विजयानंतर आज मातोश्री येथे गुलाल उधळण्यात आला. शिवसैनिकांनी मातोश्री बंगल्याबाहेर जल्लोष केला. एकमेकांना पेढे भरवले गेले. गाण्याच्या ठेक्यावर कार्यकर्त्यांनी ताल धरला. आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांना खांद्यावर घेऊन जल्लोष करण्यात आला. आदित्य साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है, उद्धव साहेब अंगार है, बाकी सब भंगार आहे, कोण आला रे कोण आला… शिवसेनेचा वाघ आला अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. आनंदित आदित्य यांनी त्यांची आई रश्मी ठाकरे आणि भाऊ तेजसला गुलाल लावला. तेजसने आदित्य ठाकरे यांची गळाभेट घेऊन त्यांचं अभिनंदन केलं.
यावेळी आदित्य ठाकरेंनी विजय बद्दल सर्वांचे अभिनंदन करत उपस्थितांना संबोधित केलं. विजय काय असतो हे काल दाखवून दिलं आहे. करून दाखवलं आहे. ही सुरुवात आहे. असाच विजय विधानसभेत मिळवायचा आहे. ही आजपासूनची सुरुवात आहे. गुलाल उधळला आहे. हाच गुलाल विधानसभेच्या निवडणुकीला उधळायचा आहे. त्यासाठी कामाला लागा,अशा सूचना त्यांनी शिवसैनिकांना दिल्या.
हा दस का दम आहे
हा दस का दम आहे. 2008 मध्ये 10 पैकी 8 जागा जिंकल्या. त्यानंतर दहा पैकी दहा जिंकल्या. आता पुन्हा दहा पैकी दहा जागा जिंकल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्यावर जनतेचा विश्वास आहे. ही विधानसभेची लिटमस टेस्ट नव्हती. ही प्रिपरेशनची रन होती. तयारी होती. ज्यांना जायचं त्यांना जाऊ द्या. जनतेचा आमच्यावर जो विश्वास आहे, तो कायम आहे. पदधवीधर आणि शिक्षक मतदारसंघ आम्ही जिंकलो आहोत. आता सिनेटही जिंकली आहे.
कोर्टाचेही मानले आभार
यावेळी जी निवडणूक झाली. दोनदा हायकोर्टात गेले. एकदा सर्वोच्च न्यायालयात गेले. आम्ही कोर्टाचे आभार मानतो. कोर्टाने आमची सुनावणी तात्काळ घेतली. निवडणूक आयोगाकडे एकच विनंती आहे की त्यांनी भाजप कार्यालयाकडून निवडणुका घेण्याची परवानगी घ्यावी. राज्यात कायदा सुव्यवस्थेची बिघाड झाली आहे. राज्याला गृहमंत्री आहे की नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे हाय अलर्ट रोजचाच आहे अशी टीका आदित्य यांनी केली.
महापालिकेच्या निवडणुका घ्या. दोन वर्ष प्रलंबित आहे. विधानसभेच्या निवडणुकाही घ्या अशी मागणीही त्यांनी केली.
0 Response to "Senate Election : हा दस का दम… आदित्य ठाकरे यांनी विजयी होताच भरला हुंकार..."
टिप्पणी पोस्ट करा