“तुटेल इतकं ताणू नये”, उद्धव ठाकरे यांचं काँग्रेसला उद्देशून मोठं वक्तव्य...
महाराष्ट्र,मुंबई: महाविकास आघाडीच्या जागावाटपात ठाकरे गट आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरे गटाने उघडपणे नाना पटोले यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे. या वादावार उद्धव ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली.
भाजप नेते राजन तेली यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला. राजन
तेली यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी जात ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांच्या
पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. यावेळी उद्धव
ठाकरे यांनी जागावाटपावरुन काँग्रेस आणि ठाकरे गटात झालेल्या वादावर भूमिका
मांडली. महाविकास आघाडीची जागावाटपाबाबतची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत
ठाकरे गटाचे नेते आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात खटके उडाल्याची
माहिती आहे. त्यामुळे ठाकरे गटाने नाना पटोले यांच्याविरोधात अधिकृत भूमिका
मांडली. नाना पटोले असतील तर या पुढे जागावाटपाची बैठक होणार नाही, अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली. त्यामुळे महाविकास आघाडीतील
जागावाटपाचा वाद विकोपाला पोहोचला. आता या वादानंतर दोन्ही बाजूने सारवासारव केली
जात आहे. असं असताना उद्धव ठाकरे यांनी तुटेपर्यंत ताणू नये, असा इशारा काँग्रेसला दिला आहे.
उद्धव ठाकरे यांना यावेळी काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यातील
जागावाटपाबाबत असलेल्या वादाबद्दल प्रश्न विचारण्यात आला असता, “मी याबद्दल माहिती घेईन आणि तुमच्याशी बोलेन”, असं ते सुरुवातीला म्हणाले. “मी याबद्दल माहिती घेऊन आपल्याशी बोलेन.
एका पेक्षा जास्त पक्ष जेव्हा एकत्र निवडणूक लढवतात तेव्हा नाही म्हटलं तरी
जागांच्या बाबतीत थोडीशी खेचाखेची होते. पण ती तुटेपर्यंत ताणायची नाही हे सगळ्या
पक्षांनी लक्षात ठेवलं पाहिजे”, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
‘फार मोठा वाद झालेला नाही’
“मला असं वाटतं की, अजूनही असा फार मोठा वाद झालेला नाही.
तसं काही माझ्या कानावर आलं नाही. मगाशी खासदार संजय राऊत हे देखील येऊन गेले.
आमदार अनिल परब हे देखील इथेच आहेत. माझ्या कानावर ज्यावेळेला येईल त्यावेळेला मी
नक्की बोलेन. दोन-तीन दिवसांत किंवा उद्या जागावाटप संपू शकतो. तो विषय अंतिम
टप्प्यात आलेला आहे. जागावाटप जाहीर झालेलं नाही. प्रत्येक पक्ष वेगवेगळा आहे.
विलीनीकरण झालेलं नाही. साहजिकच आहे, याआधी आम्ही एकमेकांच्या विरुद्ध लढलेलो
आहोत. लोकसभेला जागा कमी होत्या, विधानसभेला जास्त होत्या. त्यामुळे
जागावाटपाबाबत चर्चा होईल”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
‘महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीत
मविआचं सरकार येणार’
“महाराष्ट्रातील राजकीय वातावरण बदललं आहे. महाराष्ट्रात कोणत्याही
परिस्थितीत महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. किंवा महाविकास आघाडीचं सरकार
आणणारच हे महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलं आहे. राजन तेली यांच्या संघर्षाला अंतिम
रुप द्यायचं आहे म्हणून ते परत शिवसेनेत आले आहेत”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
यावेळी उद्धव ठाकरे यांना लोकसभा
निवडणुकीच्या निकालाबाबतही प्रश्न विचारण्यात आला, त्यावर त्यांनी “कधीतरी गोलमाल होतो, जसा लोकसभेत अमोल कीर्तिकर यांच्यावेळी
गोलमाल झाला, तसा कोकणात झाला असेल. पण कोकणात शिवसेना ही एकजीव आहे. शिवसेनेला
कोकणापासून आणि कोकणाला शिवसेनेपासून कोणी तोडू शकत नाही हे येणाऱ्या निवडणुकीत
पुन्हा सिद्ध करुन दाखवू”, अशी प्रतिक्रिया दिली.
0 Response to "“तुटेल इतकं ताणू नये”, उद्धव ठाकरे यांचं काँग्रेसला उद्देशून मोठं वक्तव्य... "
टिप्पणी पोस्ट करा