मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

'आबा गेल्यानंतर नऊ वर्षांनी मळमळ दाखवली', अजित पवारांच्या गंभीर आरोपावर रोहित पाटलांची पहिली प्रतिक्रिया...

'आबा गेल्यानंतर नऊ वर्षांनी मळमळ दाखवली', अजित पवारांच्या गंभीर आरोपावर रोहित पाटलांची पहिली प्रतिक्रिया...


महाराष्ट्र,सांगली : 
आर आर पाटील  यांनी माझा केसाने गळा कापला, 70 हजार कोटींच्या घोटाळ्यांच्या चौकशी फाईलवर आर आर पाटील यांनीच सह्या केल्या. आर आर पाटील यांनी सह्या केल्याचं देवेंद्र फडणवीस  यांनीच मला दाखवलं, असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी दिवंगत आर आर पाटील यांच्यावर केला आहे. आता यावर आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील  यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे बिगुल वाजले आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार असून सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तासगाव येथे संजय काका पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ केला. तासगावमध्ये आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील विरुद्ध संजय काका पाटील यांच्यात लढत होत आहे. या प्रचार सभेतून अजित पवारांनी आर आर पाटलांवर गंभीर आरोप केला. 

नऊ वर्षानंतर मळमळ बोलून दाखवली

याबाबत रोहित पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले की, अजितदादा वयानं मोठे आहेत, एकेकाळी त्यांनी नेतृत्व केलं आहे, आम्ही देखील त्यांचं नेतृत्व स्वीकारत काम केलं आहे. आबांच्या पश्चात त्यांचं मार्गदर्शन होत असे. पक्षफुटीनंतर आदरणीय पवार साहेबांचं आबांच्या जडणघडणीतील योगदान लक्षात घेता आबा असते तर पवार साहेबांसोबत उभे राहिले असते. त्यामुळे आम्ही पवार साहेबांसोबत ताकदीनं उभे राहण्याची भूमिका घेतली. आजचं दादांचं स्टेटमेंट मी ऐकलं. माझे वडील जाऊन नऊ-साडे नऊ वर्ष झालेली आहेत. नऊ साडे नऊ वर्षानंतर ही मळमळ बोलून दाखवली. माझ्या कुटुंबीयांना दु:ख झालं आहे. 

त्यांच्या वक्तव्यानं कुटुंबीयांना दु:ख 

त्या काळी काय घडलं याची उत्तरं आबा गेल्यानंतर आम्ही देऊ शकत नाही. त्यावेळी काय घडामोडी असतील, काय घडलं असेल त्याची उत्तरं आबा हयात नसताना देऊ शकत नाही. आबा प्रामाणिकपणानं, स्वच्छपणानं काम करत होते. गृहमंत्री असताना पारदर्शकपणे त्यांनी पोलीस भरती करुन घेतली. चांद्यापासून बांद्यापर्यंत चांगलं काम केल्याचा प्रत्यय लोकांना आहे. आबा गेल्यानंतर साडे नऊ वर्षांनी असा आरोप होत असेल तर दु:ख होत आहे. अजितदादा ज्येष्ठ आहेत, नऊ वर्षात त्यांच्या नेतृत्त्वात काम केलं आहे. आज त्यांच्या वक्तव्यानं कुटुंबीयांना दु:ख झालंय, सर्व कार्यकर्त्यांना दु:ख झालं आहे.

आज आबा असते तर...

आता एक गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे, आबांना जाऊन साडेनऊ वर्ष आहेत. आबा हयात असते तर त्यांनी उत्तर दिलं असतं. गृहमंत्री म्हणून काम करताना आबांनी पारदर्शकपणे काम केलं. डान्सबार बंदींचं काम आबांनी केलं. महाराष्ट्रातील माता भगिनींची अब्रू वाचवली हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून  डान्सबार बंदीचं काम आबांनी काम केलं. इथले उमेदवार जे आहेत त्यांची परिस्थिती मतदारसंघात चांगली नसल्यानं अजित पवार यांना तसं वक्तव्य करावं लागत आहे. स्वच्छपणाला, पारदर्शकपणाला विरोध असेल तर माझं आणि माझ्या कुटुंबीयांचं दुमत असण्याचं कारण नाही. आबांनी गृहमंत्री म्हणून पारदर्शकपणे काम केलं याचं अभिमान असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. आज आबा  असते तर उत्तर देऊ शकले असते. आबा बोलण्याच्या बाबतीत आणि उत्तर देण्याच्या बाबतीत पटाईत होते. अजित पवारांनी आठवण सांगितली असेल त्याच्याकडे टीका म्हणून बघत नाही, असंही रोहित पाटील म्हणाले.

अजित पवारांचा आरोप

70 हजार कोटी रुपयांचे घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर कारवाई करण्यासाठी फाईल गृह मंत्रालयाकडे गेली होती. त्यावेळी गृहमंत्री असणारे आर आर पाटील यांनी माझी खुली चौकशी करावी असे सांगत फाईलवर सही केली होती. त्यानंतर सरकार गेलं. राष्ट्रपती राजवट लागू झाली. मात्र, माझ्या सहीवर राज्यपालांनी सही केली नाही. सरकार बदललं 2014 साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी मुख्यमंत्री म्हणून कारवाई करण्यासाठी माझ्या फाईलवर सही केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या बंगल्यावर मला बोलवून आर आर पाटील यांनीच तुमची खुली चौकशी करावी असे आदेश देत सही केल्याचे दाखवलं. ज्याच्यावर एवढा विश्वास ठेवला. एवढं सहकार्य केलं. त्याच आर आर पाटील यांनी माझा केसाने गळा कापला होता, असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. 

 

0 Response to "'आबा गेल्यानंतर नऊ वर्षांनी मळमळ दाखवली', अजित पवारांच्या गंभीर आरोपावर रोहित पाटलांची पहिली प्रतिक्रिया... "

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...